अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न? भाजप कार्यालयात झळकले दोन्ही राजांचे फोटो

सातारा – भाजपच्या सातारा जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो झळकले आहेत. जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांच्या पुढाकाराने हे घडल्याची चर्चा आहे. उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यामध्ये वाद पेटला असताना, भाजप एकसंध असल्याचे दाखवण्याची खटपट सुरू झाली आहे.
आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना, विसावा नाका येथे भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आ. गोरे यांची छायाचित्रे कार्यालयात लावण्यात आली होती. आ. गोरे यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यालयाची सजावट करण्यात आली होती. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व आ. जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका आ. यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट अनिल देसाई यांनी केला होता. त्यानंतर धैर्यशील कदम यांनी उदयनराजे समर्थकांचा ‘बगलबच्चे’ असा उल्लेख केल्याने, उदयनराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण धस्के यांनी पत्रक काढून या प्रकाराचा निषेध केला होता. जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची छायाचित्रे का नाहीत, असा सवाल जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारला असता होता. त्यावर, या कार्यालयात मी कोणताही बदल केलेला नाही. कार्यालयाची सजावट आ. गोरे यांच्या जिल्हाध्यक्षदाच्या काळातील आहे, असे उत्तर कदम यांनी दिले होते.
लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात या दोघांची छायाचित्रे नसल्याची सल दोन्ही राजांच्या समर्थकांना होती. उदयनराजे समर्थक व धैर्यशील कदम यांच्यातील राजकीय नाराजी संपलेली नाही, असे चित्र असताना, जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांच्या पुढाकाराने कार्यालया उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांची छायाचित्रे शुक्रवारी (दि. 12) झळकली. या दोघांची छायाचित्रे झळकल्याचे सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्याने, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा निरोप आला आहे की काय, अशी विचारणा होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सातारा जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत वाद किंवा राजकीय हेवेदावे असू नयेत, असे प्रदेश कार्यकारिणीचे निर्देश आहेत. असे असताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हेच राजे गटाच्या रडारवर आल्याने धुसफुस संपायला तयार नाही. खासदार उदयनराजे सातार्यात आल्यानंतर कोणत्या राजकीय हालचाली होणार, याची उत्सुकता आहे.
Remarks :





