Milk prices: दूध दर वाढला, शेतकरी मात्र अडचणीत; नफ्याऐवजी खर्चच अधिक
Milk prices: पशुखाद्य, खतांच्या दरवाढीचा दुग्ध व्यवसायाला फटका

सोपान येवले
कान्हे – मावळ तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. गेल्या काही महिन्यांत दुधाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे पशुखाद्य, चारा, औषधे, खते आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च सातत्याने वाढत असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस पालन करून दूध व्यवसाय करतात. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला दुग्ध व्यवसायाची जोड मिळत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही काळात पशुपालनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
पूर्वी दुधाला सुमारे ५० रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. सध्या डेअरीकडून सुमारे ६० रुपये प्रतिलिटर दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे प्रतिलिटर सुमारे दहा रुपयांची वाढ झाली आहे. मात्र याच काळात जनावरांसाठी लागणाऱ्या पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
पूर्वी सुमारे २ हजार ५०० रुपयांना मिळणारे पशुखाद्य आता सुमारे ३ हजार २७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दूध दरवाढीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
दूध उत्पादनासाठी केवळ पशुखाद्यावरच खर्च होत नाही. हिरवा चारा, सुका चारा, औषधोपचार, लसीकरण, जनावरांची देखभाल आणि मजुरीचा खर्चही करावा लागतो असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, अशी मागणी होत आहे. केवळ दुधाचा दर वाढवून प्रश्न सुटणार नाही. पशुखाद्य, चारा, औषधे आणि पशुपालनाशी संबंधित इतर खर्च कमी करण्यासाठीही ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.
पशुखाद्य आणि चाऱ्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. दूध उत्पादकांना पशुखाद्य आणि औषधांवर सवलत किंवा अनुदान मिळावे. तसेच जनावरांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सुविधा अधिक सक्षम कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खतांच्या दरवाढीचाही शेतीला फटका
दुग्ध व्यवसायासोबतच शेतीच्या वाढत्या खर्चाचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. भात पिकासाठी विविध प्रकारच्या खतांचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या काही काळात खतांच्या किमतीतही वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात.
पूर्वी ८०० ते १ हजार रुपयांच्या आसपास मिळणारी काही खते आता १,६०० ते २,२०० रुपयांपर्यंत विकली जात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. १८-१८-१० खताचा दर सुमारे १,४०० रुपये, तर २०-२०-१३ खताचा दर सुमारे १,५०० रुपये असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
युरियाच्या दरातही वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे शेतीचा खर्च वाढत आहे. दुसरीकडे शेतीला जोड म्हणून केलेल्या दुग्ध व्यवसायातही उत्पादन खर्च वाढत आहे. परिणामी ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे.
शेतीला जोडधंदा की वाढता आर्थिक बोजा?
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा केवळ अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत नाही. शेतीतील उत्पन्न अनिश्चित असल्याने दररोजचे उत्पन्न मिळावे म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे वळतात. सकाळ-संध्याकाळ दूध काढणे, जनावरांना चारा देणे, पशुखाद्य देणे, गोठ्याची स्वच्छता करणे आणि आजारी जनावरांवर उपचार करणे, अशी नियमित कामे करावी लागतात.
मात्र या सर्व खर्चाचा विचार करता दूध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अपेक्षेइतके राहत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू ठेवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे.
‘दुधाचा दर ५० रुपयांवरून ६० रुपये झाला आहे. मात्र पशुखाद्य, चारा आणि औषधोपचाराचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दर वाढला असला तरी हातात राहणारा फायदा फारसा वाढलेला नाही. दूध उत्पादनाचा खर्च कमी झाला तरच या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते.’- विशाल वावरे, दूध उत्पादक शेतकरी.






