जम्मू – दहशतवाद्यांशी रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये झुंजताना लष्कराचे ८ जवान जखमी झाले. त्यातील एकाला वीरमरण आले. सुरक्षा दलांची संबंधित दहशतवाद्यांच्या विरोधातील संयुक्त मोहीम सोमवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्याच्या दुर्गम जंगलव्याप्त भागात सुरक्षा जवानांनी रविवारी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्याने त्यांच्यात चकमक झडली. त्यामध्ये जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, जखमी झालेल्या हवालदार गजेंद्र सिंह यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, रविवारी चकमकीची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने अतिरिक्त सुरक्षा बळ घटनास्थळी धाडण्यात आले. त्यामध्ये पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी रविवारी रात्री दहशतवाद्यांच्या शोधासाठीची मोहीम थांबवली. ती सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू झाली. त्या मोहिमेवेळी चकमकीच्या ठिकाणाजवळील दहशतवाद्यांच्या दडण्याचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. त्या अड्ड्यावर धान्य, खाद्यपदार्थ, गॅस सिलिंडर, स्टोव्ह आदी सामग्री आढळली.