बंगळुरात कमी तीव्रतेच्या स्फोटात आमदार जखमी

बंगळुरू : येथील शांतीनगर भगात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटात कॉंग्रेसचे आमदार एन. ए. हॅरीस यांच्यासह अन्य सहा जण जखमी झाले. बंगळुरूच्या मध्यवर्ती भागात एका सांस्कृतिक कार्यक्रमातील स्फोटात ही दूर्घटना घडली. मात्र हा स्फोट फटाक्यांचा होता की बॉम्बचा होता, याचा शोध घेतला जात आहे.
एमजीआर यांच्या जयंती कार्यक्रमास हॅरिस आले होते. या स्फोटात हॅरीस आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सहा जणांना भाजल्याच्या जखमा झाल्या. त्यांच्यावर नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिस उपायुक्त चेतन सिंग राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. न्यायवैद्यक तज्ज्ञांनी घटनास्थलावरून जळलेल्या सामुग्रीचे नमुने घेतले आहेत. त्याच्या अहवालानंतर या स्फोटाचे स्वरूप समजू शकेल. हॅरीस यांचा मुलगा महंमद नालापाद हे समर्थकांसह रुग्णालयात पोहोचले. त्यांनी सांगितले की, काही तरी घरंगळत हॅरीस यांच्या पायायपाशी आले आणि त्याचा स्फोट झाला. त्यांच्या पायाला भाजल्यने जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.





