Satara News : तासवडे (ता. कराड) औद्योगिक वसाहतीतील एस के एस फाईन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी (Satara News) सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक मोठा स्फोट झाला. या दुसऱ्या स्फोटाने तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. संपूर्ण औद्योगिक वसाहत आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सव्वा आठच्या दरम्यान झालेल्या पहिल्या स्फोटानंतर कंपनीत आग लागली होती. अग्निशमन दलाने तीन तासांच्या सतत प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, रात्री उशिरा पुन्हा (Satara News) एका मोठ्या स्फोटाने परिस्थिती चिघळली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, जवळपास तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर धक्के बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. Satara News सुदैवाने जीवित हानी नाही दोन्ही स्फोटांमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, कंपनीच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीतून स्फोट झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्यासह पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पुन्हा घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाने पुन्हा आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, सकाळच्या स्फोटानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असतानाही रात्री पुन्हा स्फोट झाल्याने कंपनीतील रासायनिक प्रक्रिया किंवा अवशेषांमधून दुसरा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत (Satara News) आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनी परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.