Amol Mitkari : अजित पवारांचा घातपात? ऐनवेळी पायलट बदलणारा सूत्रधार कोण?; अमोल मिटकरींचा थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदिग्ध विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्याच महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे.

Amol Mitkari : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदिग्ध विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्याच महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे.
अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणाऱ्या शासकीय ‘देवगिरी’ निवासस्थानावरील सीसीटीव्हीचे फुटेज नऊ महिने उलटूनही शोधू न शकणारं राज्यातील महायुती सरकार पूर्णपणे निरुपयोगी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
अकोल्यातील म्हैसपूर येथील आपल्या शेतात आयोजित ‘बळी महोत्सव’ या शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं असून, अजितदादांचा घातपात झाल्याच्या आरोपाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
स्वतःला अजितदादांचे घनिष्ठ मित्र म्हणवून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ महिन्यांनंतरही या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी का लावत नाहीत, असा थेट सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला.
प्रवासाच्या संपूर्ण नियोजनावर संशय व्यक्त करताना ते म्हणाले की, अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवारांचा प्रवास रस्ते मार्गाने निश्चित झालेला असताना, ऐनवेळी हा निर्णय बदलायला लावून त्यांना विमानाने जाण्याचा सल्ला कोणी दिला? तसेच उड्डाणापूर्वी विमानातील पायलट आणि इतर क्रू मेंबर्स कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आले, याचा सूत्रधार समोर आला पाहिजे.
या प्रकरणात अघोरी पूजेचा धक्कादायक संशय व्यक्त करताना मिटकरी यांनी सांगितले की, आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना त्यांनी अजितदादांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर अघोरी पूजा करणाऱ्या संदर्भातील पुरावे सोपवले आहेत. खरातच्या आश्रमात करंगळ्या कापून कोणत्या अघोरी प्रथा राबवण्यात आल्या याचा शोध तपास यंत्रणांनी तातडीने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सत्ताधारी पक्षातीलच एका महत्त्वाच्या नेत्याने थेट मुख्यमंत्री, प्रशासन आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता महायुतीत प्रचंड खळबळ उडाली असून याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली (Amol Mitkari) जात आहे.






