Maharashtra Political Crisis : शरद पवारांना भेटून आल्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले,”मतदारांना फसवल्यासारखं…”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत ९ मंत्र्यांसह शिंदे-भाजप यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. मात्र, त्यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर यावर भाष्य केले.
राज्यातील घडामोडींवर बोलत असताना अमोल कोल्हे यांनी, “मी माझी भावना, अस्वस्थता शरद पवारांसमोर मांडली. आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, घडामोडी बघितल्या, तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायित्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.”असे म्हटले.
त्याचबरोबर “मी शरद पवारांना एक पत्र दिलं आहे. त्यात हीच भूमिका मांडली की, मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करत आलो आहे. त्यामुळे ३५० वर्षे अस्तित्वात असलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेऊन मी राजकारणात आलो,” असेदेखील अमोल कोल्हेंनी सांगितले.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी,“आताच्या परिस्थितीत विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय ही अस्वस्थता मी मांडली. तसेच शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं. हे मी लिखित स्वरुपात त्यांना दिलं. यावर शरद पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणाईची आहे, असे सांगितले. तसेच त्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं असल्याची आठवण करून दिली,” असेही अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले.





