Amol Kolhe : “गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही…”; ‘गुलाबी कॅम्पेन’वरून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar | Pink Jacket । Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीत फक्त एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.
याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, आता गुलाबी कॅम्पेनवरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली. यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “गुलाबी यात्रा पुढं गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोफ डागली.
ते पुढे म्हणाले, “ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या, पण महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. इतकंच नाही, तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिलं. वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं.
स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवले. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवतील. 60 ते 62 विधानसभा मतदार संघात तुतारीचा आवाज येत आहे. आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले.





