Amol Kolhe : मुंढवा, केशवनगरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आराखडा तयार करा – खासदार डॉ.अमोल कोल्हे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंढवा आणि केशवनगर भागातील नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असून या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करा आणि नागरिकांना दिलासा द्या, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला केल्या.शिरूर लोकसभा मतदार संघात हडपसर विधानसभा मतदार संघ येतो. या विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी डॉ. कोल्हे यांनी महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
या बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे यांच्यासह महापालिकेचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, अपुरा पाणीपुरवठा आदींसह विविध प्रश्न मांडले. कचऱ्यामुळे हडपसर अस्वच्छ होत आहे, पाणी दूषित होत आहे, बोअरवेलमध्येही दूषित पाणी येते या प्रश्नांचा त्यात समावेश होता.
शहरातील चारही दिशांना प्रकल्प होणार होते, असे असताना सर्व प्रकल्प केवळ हडपसरलाच का, हडपसरवर महापालिका अन्याय का करत आहे, शहराला नको असलेले प्रकल्प हडपसरला दिले आहेत. येथे नागरीक रहात नाहीत का, असा सवाल या नागरिकांनी विचारला. रामडेकडी येथे ७०० टनाचा कचरा प्रकल्पा आहे. हा प्रकल्प सुरू नाही, तरीही येथे कचरा येतो, तो भरला जातो, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.
हडपसर परिसरात किती कचरा प्रकल्प आहेत आणि शहराच्या इतर भागात किती प्रकल्प आहे, शहराच्या चारही भागात कचरा प्रकल्प उभारण्याचे काय झाले, असे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी प्रशासनाला विचारले. त्यावर अधिकारी निरुत्तर झाल्याचे पहायला मिळाले. होर्डिंग सुरक्षेसाठी काय व्यवस्था केलेली आहे का, हे विचारल्यावर अधिकाराऱ्यांनी सर्व्हे करून होर्डींग आणि फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर केवळ बोर्ड नको तर त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा आणि त्याचा रिपोर्ट सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

