अमित ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी; ईव्हीएमला दोष देत बसू नका, कामाला लागा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीचे खापर राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर फोडले असले तरी अमित ठाकरे यांनी ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला आपण देखील तेवढेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतकेच नाही तर मनसे बैठकीत अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी देखील दिली आहे. आगामी पंधरा दिवसात महानगरपालिका निवडणूक आली आहे असे समजा आणि कामाला लागा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक होऊ शकते हे सिद्ध करून दाखवा, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर आपले मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली होती. आगामी काळातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानले जात आहे. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची समीक्षा देखील पक्षाच्या वतीने केली जात आहे.
याच बैठकीमध्ये अमित ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पंधरा दिवसात मनपा निवडणूक आहेत असे समजून कामाला लागा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. इतकेच नाही तर काम होत नसेल तर पद सोडा, अशा प्रकारचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांना दिला आहे.





