अमित ठाकरे ‘त्या’ फोटोच्या कॅप्शनमुळे झाले ट्रोल; नेटकरी म्हणाले,”आज रंगपंचमी…”

मुंबई : राज्यात दोन वर्षानंतर होळीसह धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यात मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांचा देखील समावेश आहे. फेसबुकवर कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून ते ट्रोल झाले आहेत.
अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर धुलिवंदनाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अमित ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय रंगात रंगलेले दिसत आहेत. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ,‘रंग नात्यांचा..! रंग आनंदाचा..! रंग पंचमीच्या मनापासून शुभेच्छा..!’ असे लिहिले. या कॅप्शनवरून काही सोशल मीडिया युजर्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

अमित ठाकरे यांच्या या फोटोवर कमेंट करताना काही युजर्सनी त्यांना, ‘आज रंगपंचमी नाही तर धुलिवंदन आहे’ असं म्हणत ‘मराठी सण जापा’ असे सांगितले आहे. तर काहींनी ‘आज रंगपंचमी नाही तर धुलिवंदन आहे रंगपंचमी २२ मार्चला आहे’ अशी आठवण देखील करून दिली आहे. अमित ठाकरे यांच्या फोटोवरील या कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात पाऊल टाकलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित यांच्याकडे मनसेचं आगामी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं.





