मनविसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह २०-३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मनसेचे युवक सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी ॲक्शनवर रिॲक्शन होणारच असा इशारा दिला आहे. यामुळे अभाविप आणि मनविसेतील वाद चिघळल्याची चिन्हे दिसत आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे यांच्या फिर्यादीनुसार मनविसेचे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह २० ते ३० जणांविरुद्ध गु्न्हा केला आहे. फिर्यादीनुसार मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी कार्यालयात शिरले. तेथील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, तोडफोड करुन कार्यालयाला कुलूप निघून गेले. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबागच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत. … तर आम्ही हात घालणार मनसेचे युवक सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर अभाविपला इशारा दिला. ते म्हणाले, तुम्ही बोट घातलंत, तर आम्ही हात घालणार, ॲक्शनवर रिॲक्शन होणारच. हा प्रकार दुसऱ्यांदा झाला आहे. सत्तेत असल्याने कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत उभा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवायची माझी इच्छा नाही, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आमच्या विरोधात लावलेल्या पोस्टरबाबत पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्ही तपासला जाईल. जर त्यात त्यांची मुलं आढळली, तर त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील. पुण्यातील परिस्थितीबाबत ठाकरे म्हणाले, ज पुण्याची परिस्थिती गंभीर आहे. ड्रग्स, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारू हे प्रकार वाढत आहेत. पोर्शे अपघातानंतरही काही झालं नाही. अठरा वर्षाखालील मुलांना दारू देणं ही भयंकर गोष्ट आहे, आणि याची आम्ही लिस्ट तयार करतोय.