सोलापूर : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा प्रकार घडला होता. या हत्याकांडानंतर सोलापूरातील स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले. उमेदवारी अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या खटाटोपातून हा प्रकार घडला आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होते, मात्र उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लोकप्रतिनिधींचे देखील मुले-मुली आहेत, मी जसे बघितले तसे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बघावे. अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्हीच जिंका अशा निवडणुका, तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले आहे हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? आपल्या सगळ्यातला माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल, असे अमित ठाकरेंनी यावेळी म्हटले. प्रणिती शिंदेंनी केली टीका सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही मूक आंदोलन केले. सरवदे कुटुंबियांसोबत आम्ही सर्वजण आहोत. भाजपाची सत्तेसाठी जी भूक आहे, ते जिंकण्यासाठी काहीही करू शकतात. भाजपचा खरा चेहरा आज सर्वांसमोर आला आहे. पैसा आणि सत्ताच नाही तर ते आता रक्तावर येऊन थांबले आहेत, लोकांच्या सेवेसाठी नाही तर लोकांचे जीव घेऊन त्याना सत्तेत यायचं आहे, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई राक्षसी भाजप विरोधात सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले.