अमित शहांचे राहुल गांधींना दोन प्रश्न: MSPचा फुल फॉर्म माहित आहे का? खरीप आणि रब्बी पिकं कोणती?

रेवाडी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांना घेरले. राहुल यांना एमएसपीचा (किमान आधारभूत किंमत) फुल फॉर्म ठाऊक आहे का? खरीप आणि रब्बी पिक कुठले याची माहिती त्यांना आहे का, असे सवाल त्यांनी केले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी शहा यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हरियाणातील भाजप सरकारने शेतकरी हितासाठी उचललेल्या पाऊलांची माहिती दिली. हरियाणात २४ पिकांची खरेदी एमएसपीनुसार केली जाते. कुठल्या कॉंग्रेसशासित राज्यात तसे पाऊल उचलण्यात आले आहे ते त्या पक्षाच्या नेत्यांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. भ्रष्टाचार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली.
भाजपने मागील १० वर्षांच्या सत्ताकाळात हरियाणात सर्वांना न्याय देणारा विकास घडवला. तसेच, भ्रष्टाचार संपवला. त्याउलट, कॉंग्रेसची सरकारे भ्रष्टाचारावर आधारलेली होती, असे त्यांनी म्हटले. राहुल यांनी अमेरिका दौऱ्यात आरक्षण संपवण्याचे मनसुबे जाहीर केले. पण, त्यांना ते कसे जमेल? देशात भाजपचे सरकार आहे. भाजपचा संसदेत एक खासदार असला तरी आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिली.





