‘अमित शहा यांचे ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्ह’ – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले. मात्र, शहा यांचे संबंधित वक्तव्य आक्षेपार्ह आहे, अशा शब्दांत खासदार आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आपचे प्रमुख केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्याविषयी शहा यांनी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांच्याविषयीचा निर्णय नियमित स्वरूपाचा नाही. त्या प्रकरणात विशेष वागणूक देण्यात आल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे, असे त्यांनी म्हटले.
त्यावरून सिब्बल यांनी शहांवर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हेतूवरच शहा यांनी सवाल उपस्थित केला. दोषी ठरवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली; तर संबंधित व्यक्ती उमेदवारी अर्ज भरून निवडूनही येऊ शकते.
आरोपपत्र दाखल झालेली व्यक्तीही उमेदवारी अर्ज दाखल करू शकते अन् प्रचार करू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे मुलाचा प्रचार करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केवळ आरोप झाले म्हणून एखादी व्यक्ती प्रचार करू शकत नाही हे कुठल्या प्रकारचे वक्तव्य झाले? बहुधा शहांना कायद्याचे ज्ञान नाही. अन्यथा, त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते, अशी उपहासात्मक टिप्पणीही सिब्बल यांनी केली.





