Amit Shah : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द ! हुबळीतून थेट दिल्लीला रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द झाला असून, ते हुबळीतून थेट दिल्लीला गेले आहेत. हुबळीनंतर शहा यांचा कोल्हापूर दौरा होणार होता.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द झाला असून, ते हुबळीतून थेट दिल्लीला गेले आहेत. हुबळीनंतर शहा यांचा कोल्हापूर दौरा होणार होता. केएलई सोसायटीचे वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी हुबळी दौऱ्यावर असलेले शहा प्रकृती बिघडल्यामुळे नियोजित उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत.
काल एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर, आज सकाळी ते रुग्णालयाच्या उद्घाटनात सहभागी होणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने ते (Amit Shah) हॉटेलमध्येच थांबले. दुसरीकडे, शहांचा महत्वाकांक्षी 600 कोटींचा प्रकल्प प्रकाश आवाडेंच्या जवाहर साखर कारखान्याला मिळाला आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते.
शून्य कचरा संकल्पनेतून साखरेवर प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला बहुराज्य सहकार तत्त्वावरील प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सुरू करण्याचे निश्चित झाले आहे.
शहा (Amit Shah) यांनी पाठवलेल्या विशेष पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील व सीमा भागातील विविध साखर कारखान्यांच्या जागांची पाहणी केली होती. मात्र इतर ठिकाणी सोयीची जागा उपलब्ध नसल्याने अखेर जवाहर कारखान्याची निवड करण्यात आली आणि तांत्रिक पाहणीनंतर शहा यांनी हिरवा कंदील दाखवला.






