Bengal Election 2026: मतदान जवळ येताच भाजप – तृणमूलमध्ये वातावरण तापलं; ‘या’ मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी
Bengal Election 2026: बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी होणार असून निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत.

Bengal Election 2026: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात एक ‘चार्जशीट’ जाहीर करत कडाडून टीका केली. बंगालमधील आगामी निवडणूक केवळ राज्यासाठीच नाही, तर देशाच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलताना शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घुसखोरांना सहज देशात प्रवेश देत असल्याचा आरोप केला. भाजपशासित आसाममध्ये घुसखोरी जवळपास बंद झाल्यामुळे बंगाल हा घुसखोरांसाठी उरलेला एकमेव मार्ग बनल्याचा दावा त्यांनी केला.
“ममता दीदी नेहमीच ‘व्हिक्टिम कार्ड’चे राजकारण करतात. कधी जखमेची भाषा, कधी निवडणूक आयोगाला शिव्या. पण बंगालच्या जनतेने आता हे चांगलेच ओळखले आहे,” असे शाह यांनी सांगितले.
तृणमूलच्या १५ वर्षांच्या राजवटीत बंगाल हे देशातील घुसखोरीचे ‘प्रमुख केंद्र’ बनल्याचा आरोपही त्यांनी केला. ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर तृणमूलच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे धोक्यात आल्याचे ते म्हणाले.
#WATCH | Kolkata | On HM Amit Shah’s statement on a ‘chargesheet’ against the West Bengal government, TMC MP Mahua Moitra says, “You have declared every Bengali as a criminal, and you do it in four steps: first you insult us, then you deprive us, then you criminalise us, and then… pic.twitter.com/WrvVSB2Tvm
— ANI (@ANI) March 28, 2026
“सीमावर्ती भागात कुंपण घालण्यासाठी तृणमूल सरकारने जमीन दिलेली नाही, कारण त्यांना घुसखोरांचे मतदार तयार करायचे आहेत,” असा गंभीर आरोप शाह यांनी केला.
तृणमूलचे प्रत्युत्तर –
शाह यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासांतच तृणमूलचे ज्येष्ठ नेते ब्रात्य बसू, कीर्ती आझाद आणि महुआ मोईत्रा यांनी पलटवार केला. “शाह यांनी आधी मणिपूरमधील तीन वर्षांच्या हिंसाचाराचे उत्तर द्यावे,” असे मोईत्रा म्हणाल्या. पाहलगाम हत्याकांडात २६ जण ठार झाले आणि गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील स्फोटात १० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा एकही संशयित पकडला गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बसू यांनी भाजपच्याच घुसखोरी दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजप केंद्रात आणि १५ राज्यांत सत्तेत आहे. बहुतांश सीमावर्ती राज्येही भाजपच्याच ताब्यात आहेत. मग अमित शाह गृहमंत्री असताना ते काय वाट पाहत होते?” असे त्यांनी विचारले.
बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी होणार असून निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत.





