अमित शाहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर जोरदार निशाणा साधला आहे. शाहांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच औरंगजेबाच्या थडग्याला शाहांनी समाधीचा दर्जा दिल्याचंही संजय राऊत यांनी म्हटले. देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
अमित शाह यांनी रायगड दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसमोर उभे राहून औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला. तसेच शिवरायांचा वारंवार एकेरी उल्लेख करण्यात आला. परंतु त्यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवरायांच्या वंशजांना त्यावर कोणताही आक्षेप घ्यावासा वाटला नाही, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांकडून औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा इतकी वाईटवेळ आमच्यावर आलेली नाही. आम्ही औरंगजेबाचे थडगे किंवा कबर म्हणतो, ती औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटाचे शो ठेवले होते. त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधी असा केला; परंतु महाराजांचे ढोंगी चाहते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना औरंगजेबाची समाधी या शब्दावर कोणताही आक्षेप घ्यावासा वाटला नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये
औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांने काढला असता, तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्रिकुटातील दोघांनी थयथयाट केला असता. रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीने औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला. यापेक्षा महाराष्ट्रात वाईट काय घडणार? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, त्याचा हा परिणाम आहे का? त्यामुळे औरंगजेबाविषयी इतके प्रेम गुजरातच्या नेत्यांना आहे. हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला जात असताना छत्रपतींचे वंशज बाजूलाच बसलेले होते, त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा होता, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.





