Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर येथे आयोजित निवडणूक सभेला संबोधित करताना, यावेळी बंगालची जनता बॉम्बच्या राजकारणाला मतांनी उत्तर देईल आणि राज्यात भाजपचे डबल-इंजिन सरकार स्थापन करेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, त्या राज्यातील बहुसंख्य समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक केवळ सत्तांतरासाठी नसून, पश्चिम बंगाल आणि देशातून घुसखोरांना पूर्णपणे हाकलून लावण्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. Amit Shah राज्यात मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाने पुरेशा प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनात केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कडक इशारा देताना गृहमंत्री म्हणाले, टीएमसीच्या गुंडांनी मतदानाच्या दिवशी आपापल्या घरातच राहावे ; अन्यथा, ४ मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. बंगालमधील हिंसेचे राजकारण संपवून विकास आणि सुरक्षिततेचे युग सुरू करण्यासाठी भाजपने कंबर कसली असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी शाह यांच्या या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.