Amit Patkar : गोवा फॉरवर्ड पक्षाशी कॉंग्रेस करणार हातमिळवणी; अमित पाटकर यांचे मोठे विधान
भाजपची सत्ता असणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामासाठी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे (जीएफपी) मैत्रीचा हात पुढे केला आहे.

Amit Patkar : भाजपची सत्ता असणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामासाठी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे (जीएफपी) मैत्रीचा हात पुढे केला आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी महत्वाचे भाष्य केले.
आगामी निवडणुकीनंतर कॉंग्रेस-जीएफपी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर जनतेला दररोज उत्सव साजरा करता येईल, असे ते म्हणाले. त्या वक्तव्यातून कॉंग्रेस आणि जीएफपीने हातमिळवणीचे मन बनवले असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित कार्यक्रमावेळी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि जीएफपीचे प्रमुख विजय सरदेसाई हेही उपस्थित होते.
गोव्यात सध्या कॉंग्रेसचे ३ आमदार आहेत. तर, सरदेसाई यांच्या रूपाने जीएफपीचा केवळ १ आमदार आहे. त्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप हे प्रदीर्घ काळपासून एकमेकांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, मागील काही काळापासून आपचाही प्रभाव वाढत आहे. त्यामुळे गोव्यातील पुढील निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत.





