Amit Chavda : अमित चावडांची गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

नवी दिल्ली : गुजरातमध्ये कॉंग्रेसने आमदार अमित चावडा यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्याशिवाय, चावडा यांच्या जागी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तुषार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. गुजरातमध्ये नुकतीच विधानसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक झाली.
दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, त्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारून आधीचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहील यांनी पदाचा राजीनामा दिला. तो स्वीकारत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चावडा यांची नियुक्ती केली. ६५ वर्षीय गोहील यांना जून २०२३ मध्ये प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते. आता त्यांच्या जागी ४९ वर्षीय चावडा यांच्यावर कॉंग्रेसने पुन्हा विश्वास दर्शवला.
चावडा यांनी याआधीही प्रदेशाध्यक्ष पद भुषवले होते. गुजरातमध्ये २०२७ यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी अद्याप सुमारे अडीच वर्षांचा अवधी आहे. तोपर्यंत पक्ष संघटनेला सज्ज करण्यासाठी चावडा यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. आगामी निवडणुकीत सत्तारूढ भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे.





