Sanjay Raut : दादरच्या नामांतरावरून वाद सुरू असतानाच संजय राऊतांची मोठी मागणी; म्हणाले, ‘नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा!’
Sanjay Raut : नागपूरचे नामांतर 'दीक्षाभूमी' करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. सरकारने यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : गेल्या काही काळात केंद्र आणि राज्य सरकारांकडून देशभरातील अनेक शहरं, गावं आणि रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यात आली आहेत. आता दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट नागपूरच्या नामांतराची मोठी मागणी केली आहे.
नागपूरचे नामांतर ‘दीक्षाभूमी’ करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. सरकारने यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. ते म्हणाले बाबासाहेबांना सर्वात मोठी श्रद्धांजली द्यायची असेल, तर नागपूरचे नाव दीक्षाभूमी करणे योग्य ठरेल.
सरकारने हा निर्णय घेतल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ : संजय राऊत
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संपूर्ण देशाला अभिमान, आत्मीयता आणि श्रद्धा आहे. बाबासाहेबांना सर्वात मोठी श्रद्धांजली द्यायची असेल, तर नागपूरचे नामांतर दीक्षाभूमी करा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाली. सरकारने हा निर्णय घेतल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ.” नागपूरचे नाव दीक्षाभूमी करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इंदू मिल स्मारकाच्या खर्चावरही उपस्थित केले प्रश्न
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही मुद्दा उपस्थित केला. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारले जावे, ही सर्वांची इच्छा असून त्यासाठी आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, या स्मारकाच्या प्रकल्पाचा खर्च का वाढला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टेंडर, धरणे आणि नद्यांच्या प्रकल्पांच्या खर्चात वाढ होणे समजू शकते; मात्र स्मारकाच्या प्रकल्पाची किंमत वाढण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निकाल अपेक्षित असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे की, आमदार आणि खासदार फोडून सरकार बनवल्यास आणि निवडणूक आयोगाने त्याला पाठिंबा दिल्यास देशात कोणतेही सरकार स्थिर राहणार नाही.






