इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; ‘सामना’तून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात

Criticism of Trump from the match : गेल्या काही काळापासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई हल्ले केले जात आहे. अशातच आता या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकाही सहभागी झाली आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या फोर्डाे, नतान्झ आणि एस्फहान या अणू उर्जा केंद्रावर हल्ला केला आहे. अशातच सामना वृत्तपत्रातून इराण आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या सहभागावर आणि राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
प्रे. ट्रम्प व त्यांच्या समर्थक देशांची टोळी जगात अराजक माजवू पाहत आहे. गाझातील नरसंहार इस्रायलने केला. प्रे. ट्रम्प हा नरसंहार, मुलांच्या हत्या थांबवू शकले नाहीत. उलट इराण-इस्रायल युद्धात ते इराणला दम भरत आहेत. भारतात नरसंहार घडवणाऱ्या पाकिस्तानी जनरल मुनीरला मात्र ते ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘डिनर’ला बोलावतात. प्रे. ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू आहेत, असा घणाघात राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे.
प्रे. ट्रम्प गाझातला नरसंहार रोखू शकले नाहीत. हा नरसंहार ज्यांनी घडवला त्या इस्रायलच्या मागे ते आज उभे आहेत. कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 26 निरपराध्यांचे बळी घेणाऱ्या जनरल मुनीरला प्रे. ट्रम्प ‘डिनरला’ बोलावतात आणि आपण शांतिदूत असल्याचा आव आणतात. अशा ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी भारतात प्रचाराचा नारळ फोडला. आता तेच ट्रम्प भारतावर उलटले आहेत, अशा शब्दांतून सामनातून ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
किमान ७० टक्के जगाला इस्रायलची ‘गुंडगिरी’ थांबवायला हवी असे वाटते. इस्रायलने गाझामध्ये ६० हजार लोकांना, ज्यात भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांचा समावेश आहे, ठार केले आहे. जे जे लोक हजारो वर्षे स्वतः अत्याचार सहन करून उभे राहिले, त्यांनीच आता अशा प्रकारचे अत्याचार करणे धक्कादायक आहे, असे देखील अग्रलेखातून म्हटले आहे.
हेही वाचा : आरोग्य सेवेचे वास्तव समोर: कोल्हापूरमधील ‘या’ रुग्णालयाला अचानक भेट, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर काय म्हणाले?





