Ambegaon News – तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांना मीना नदीचे पात्र वरदान ठरले असून, येथे सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यंदा या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे मीना नदीपात्र कोरडे पडले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी मीना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागातील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील विहीरींनीही तळ गाठला असून अनेक बोअरवेलही पाण्याअभावी बंद पडले आहेत. केटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नदीवरील वीजपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांना पाणी द्यायचे कुठून ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा पीक अंतिम टप्प्यात आले असून काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक तसेच मोठ्या प्रमाणावर गुरांचा चारा पिकेही आहेत. सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. आताच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या पुढील काळात शेतीपिकांना पाणी द्यायचे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या भागातील शेतकरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून सध्या पाण्याअभावी शेती पिके सुकून चालली आहे, तरी जलसिंचन विभागाने लवकरात लवकर मीना नदीला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी व तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्याची गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. “तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील नागापूर – वळती केटी बंधाऱ्यावरील पाणी गळतीमुळे बंधारे लवकर कोरडे पडले. अंतिम टप्प्यात आलेले कांदा पीक, जनावरांची चारा पिके धोक्यात आली आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन व केटी बंधारे यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पाणी गळतीमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेऊन त्वरित पाणी गळतीवर उपाय करून नदी पात्रात त्वरीत पाणी सोडण्यात यावे.” – तबाजी लोखंडे, शेतकरी, वळती