Ambegaon News: महावितरणचा मनमानी कारभार! वीज कपातीमुळे ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा
Ambegaon News: पारगाव, काठापूर, जारकरवाडी आणि निरगुडसर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सायंकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान घोषित-अघोषित भारनियमन.

Ambegaon News – आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील विविध गावांमध्ये महावितरणकडून सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पारगाव, काठापूर, जारकरवाडी, निरगुडसर आदी गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून होणारी वीज कपात तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत भारनियमन केले जात आहे. तसेच काही वेळा दिवसभरातही तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे आणि सचिन अस्वारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वीज भारनियमनामुळे शेतकर्यांच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत आहे. सायंकाळच्या वेळी जनावरांचे दूध काढणे, कडबाकुट्टी करून चारा तयार करणे तसेच शेतीची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. महिलांनाही घरातील स्वयंपाक व इतर कामे करताना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वीज उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. या ऊसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला असून, अनेक शेतकर्यांची घरे शेतात आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका कायम असतो. वीज भारनियमनामुळे परिसरात अंधार पसरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने भारनियमन रद्द करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.





