प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण यंदा अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण जाहीर झाल्याने राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पंचायत समिती गणाचे आरक्षण सोमवार, दि.१३ रोजी जाहीर होणार असून, त्यामध्ये आपला गण सर्वसाधारण यावा,अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.पंचायत समितीचा सभापती हा ‘मिनी आमदार’ म्हणून ओळखला जातो. यापूर्वी २००७ या कार्यकाळात आनंदराव शिंदे हे सर्वसाधारण आरक्षणातून सभापती म्हणून निवडून आले होते. तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभापती पदासाठी आरक्षण आल्याने अनेक इच्छुक नेत्यांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकू लागला आहे. काही नेते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. मात्र, सभापतीपद सर्वसाधारण झाल्याने त्यांनी आता पंचायत समितीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. काहींनी तर प्रत्यक्ष जनसंपर्क सुरू केला असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत या पदासाठी जोरदार हालचाली पाहायला मिळणार आहेत.