अंबरनाथ | देशाच्या राजकारणात जे सहसा पाहायला मिळत नाही, ते अंबरनाथमध्ये घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने अंबरनाथ नगरपालिकेत चक्क हातमिळवणी केली आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर काँग्रेसने आपल्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले असून, हे सर्व नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, या घटनेची कालपासून संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे. प्रमुख हिंदी आणि इंग्रजी न्यूज वेबसाईटवरही ही भाजप काॅंग्रेसच्या युतीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. कारण गेल्या काही वर्षात अशी युती पहिल्यांदाच पहायला मिळाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी अंबरनाथ नगरपरिषदेत ५९ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सर्वाधिक २७ नगरसेवक आहेत. मात्र, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने अनपेक्षित खेळी खेळली. भाजपने स्वतःचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादीचे ४ आणि एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन ३१ हा बहुमताचा आकडा गाठला. या मैत्रीपूर्ण समीकरणामुळे २७ नगरसेवक असूनही शिवसेनेला पिछाडीवर जावे लागले आहे. काँग्रेसची कडक कारवाई भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेताना अंबरनाथ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी प्रदेश कार्यालयाला अंधारात ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. “आम्ही भाजपसोबत नाही तर अंबरनाथ विकास आघाडीसोबत आहोत,” असा दावा पाटील यांनी केला असला, तरी पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्षांनी प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे निलंबन केले आहे. भाजपचे पारडे जड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करूंजले पाटील यांनी आधीच विजय मिळवला होता. आता काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याने पालिकेतील भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होणार आहे. या युतीमुळे राज्यातील महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाची आकडेवारी: एकूण जागा: ५९ बहुमतासाठी आवश्यक: ३० नवे समीकरण: भाजप (१४) + काँग्रेस (१२) + राष्ट्रवादी (४) + अपक्ष (१) = ३१ शिवसेना (शिंदे गट): २७ (विरोधी पक्षात)