Jitendra Awhad : अंबानींचे घर ‘वक्फ’च्या जमिनीवर; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

मुंबई : देशाच्या संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरादर खडाजंगी होत आहे. राज्यतील सत्ताधारी व विरोधाकांमध्ये विधेयकातील चर्चेवरुन, पाठिंब्यावरुन रणकंदन सुरु आहे. या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्फ बोर्ड विधेयकास स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. तसेच, अंबानींचे अँटिलीया घर हे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय, असा दावाच आमदार आव्हाड यांनी केला आहे.
हिंदू मंदिरांमध्ये अब्जावधी रुपयांचे सोने आहे, आता हे सोने तुम्ही ताब्यात घेणार का? मला सरकारने उत्तर द्यावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे. संविधानाच उल्लंघन करण्याचे काम सुरू आहे, आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिरांकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोने आहे. मग, आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? असा सवाल देखील आव्हाडांनी उपस्थित केला.
एकदा जमीन वक्फ करण्यात आली म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली, परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत, असेही आव्हाड बोलताना म्हणाले. अंबानींच घर हे वक्फच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला. आता दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहेत, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना केला.





