विधान परिषदेतील शेवटचा दिवस अंबादास दानवे यांनी केला खास

मुंबई – गेले तीन वर्षे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळल्यानंतर आज (29 ऑगस्ट) या पदाच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस अंबादास दानवे यांनी खास केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनाची भेट घडवून आणली आणि विद्यार्थ्यांसोबत दिवस घालविला. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ झाला होता. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी येथील भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या 2 री ते 5 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई येथील विधानभवनात अभ्यासदौरा आयोजित केला.
या अभ्यासदौऱ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधान भवन तसेच सभापती यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधानभवनातील कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली. विधानसभा आणि विधान परिषद तसेच मध्यवर्ती सभागृह या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. येथील कामकाजाची प्राथमिक माहिती समजून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची जिज्ञासा पाहायला मिळाली.
या भेटीत विद्यार्थ्यांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही भेटण्याचा योग आला. सभापती यांना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याला तितक्याच आनंदाने प्रा. राम शिंदे यांनीही उत्तरे दिली. सभापती राम शिंदे यांच्यासोबतचा संवाद हा विद्यार्थ्यांना समृद्ध करणारा ठरला.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने मुंबईतील वातावरणात वावरत होते. नेते आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आत्मविश्वासाने संवाद साधला. विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत वावरत होते याचे सभापती राम शिंदे यांनी कौतुक केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लवकरच विधानभवनात परत दिसतील, अशा शुभेच्छा देत सभापती शिंदे यांनी दानवे यांचा सत्कार केला.





