विलोभनीय ! आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून सुलतान अल-नेयादी यांनी टिपले हिमालयाचे सुंदर दृश्य

न्यूयॉर्क : संयुक्त अरब अमिरातीचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी अवघ्या जगाला एका विलोभनीय दृश्याची भेट दिली आहे आणि ती देखील हजारो किलोमीटर वर अंतराळातून… सुलतान अल नेयादी हे सध्या सहा महिन्यांच्या अवकाश मोहिमेवर आहेत. सध्या ते अंतराळात स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आहेत. तिथून पृथ्वी, चंद्र आणि इतर उपग्रहांची अत्यंत विलोभनीय, कधीही न पाहिलेली छायाचित्र ते त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत आहेत.
सुलतान अल नेयादी यांनी आपल्या हिमालयाची काही छायाचित्र शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये हिमालय इतका विलोभनीय दिसत आहे की काही वेळातच हजारो लोकांनी ती पाहिली आणि पुन्हा शेअरही केली आहेत! नेयादी यांनी त्यांच्या ट्वीमध्ये अवकाशातून बर्फाने झाकलेल्या हिमालयाचं छायाचित्र शेअर केलं आहे.
The Himalayas from space 🏔️
Home to the Everest summit, the highest point above sea level on earth, these mountains are one of the iconic landmarks of our planet’s rich nature. pic.twitter.com/DiQqz0L95b
— Sultan AlNeyadi (@Astro_Alneyadi) August 12, 2023
एका छायाचित्रात कापूस पिंजून ठेवल्यासारखे ढग अवघ्या हिमालयाला कवेत घेऊन बसल्यासारखे दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात बर्फाच्छादित हिमालयाची अनेक शिखरे दिसत आहेत. नेयादी यांनी आपल्या ट्वीटमध्ये त्यांना अवकाशातून दिसलेल्या हिमालयाचे वर्णन केले आहे. “अवकाशातून दिसणारा हिमालय! एव्हरेस्ट समिटचं घर! पृथ्वीवरच्या समुद्रपातळीपासूनचा सर्वोच्च बिंदू…हिमालयातली ही शिखरं समृद्ध निसर्गाचं एक विलोभनीय चिन्ह आहे”, असे नेयादी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
नेयादी यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी हिमालयाचे हे रूप कधीच पाहिले नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अवकाशातून हिमालय कसा दिसतो, हे दाखवल्याबद्दल नेयादी यांचे आभार मानले आहेत!





