सातारा | शासनाच्या योजनांसाठी तालुकास्तरीय मेळावा

वाई – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणार्या योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे अध्यक्षस्थानी होते. वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक सुनील करचे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कांबळे, ओबीसी महामंडळाचे विकास सावंत, वसंतराव नाईक महामंडळाचे प्रदीप सावंत, महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या शिष्यवृत्तींची माहिती सुनील करचे यांनी दिली. परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी दिल्लीत जावे लागते. त्यासाठी अर्थसहाय्य्य दिले जाते. एम.फिल., पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. झांबरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हिताच्या सर्व गोष्टी करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आळस झटकून प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नसून, त्या सर्वांसाठी आहेत. त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी. विजय परीट, उपप्राचार्य डॉ. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अर्जुन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सावंत यांनी आभार मानले.





