Pavana River : पवना नदीकाठचा पर्यायी रस्ता समस्यांच्या विळख्यात; अवैध पार्किंग, उंच गतिरोधक अर्धवट कामे
Pavana River: नदीकाठच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर

पिंपरी – पिंपरी चिंचवड या भागांना जोडणा-या लिंक रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकसित केलेला पवना नदीकाठचा पर्यायी रस्ता सध्या विविध समस्यांनी ग्रासला आहे. केशवनगर ते एम्पायर इस्टेट उड्डाणपूलादरम्यानचा १८ मीटर रुंदीचा हा रस्ता वाहनचालकांसाठी सोयीचा ठरेल, अशी अपेक्षा होती.
मात्र, अवैध पार्किंग, अवाजवी उंचीचे गतिरोधक, अपूर्ण डांबरीकरण आणि नदीकाठच्या सुरक्षेचा अभाव यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार केलेल्या रस्त्यावरच अडथळ्यांची मालिका निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतुकीचा वेग वाढावा आणि वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा रस्ता विकसित करण्यात आला. मात्र, सध्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या ट्रॅव्हल्स बस, अवजड वाहने आणि एका वाहन शोरूममधील मोटारी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष वापरता येणारी रुंदी कमी झाली आहे.
परिणामी, वाहनचालकांना अपेक्षित असलेला मोकळा मार्ग मिळत नाही. तसेच या परिसरात असलेल्या गॅरेजमधील भंगार वाहने देखील याच रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने साफसफाईला देखील अडथळा ठरत आहे. संबंधित विभागाने या पार्किंगवर नियंत्रण आणून रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची गरज आहे.
लक्ष्मीनगरमधील उंच गतिरोधकाची डोकेदुखी
लक्ष्मीनगरजवळील उंच टेबल गतिरोधक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार आहे. हा गतिरोधक जवळपास एक फूट उंच असल्याने त्यावरून जाताना वाहनांना जोरदार धक्का बसतो. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
डांबरीकरणाअभावी धुळीचे साम्राज्य
रस्त्याचा काही भाग अद्याप कच्चा असल्याने परिसरात उडणारी धूळ नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, वाहनचालकांनाही त्याचा त्रास होत आहे. रस्त्यावर पसरलेली खडी दुचाकी घसरण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे किरकोळ अपघातांचा धोका वाढला आहे. या भागाचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
पवना नदीकाठच्या सुरक्षेचा प्रश्न
या मार्गावरील आणखी एक गंभीर बाब म्हणजे नदीकाठच्या संरक्षणाचा अभाव. रस्त्यालगत काही भागामध्ये लाकडाच्या बांबूचे कठडे उभारले असून ते बांबू अपघात रोख शकणार आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या संवेदनशील भागांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे.
भूसंपादन रखडल्याने प्रकल्प अपूर्ण
काळेवाडी पूल ते एम्पायर इस्टेट पूल यांना जोडणारा हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. मात्र, केशवनगर परिसरातील काही जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नसल्याने रस्त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाही.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रस्त्यावरील अवैध पार्किंग हटवणे, उंच गतिरोधकाची तांत्रिक तपासणी करणे, अपूर्ण भागाचे डांबरीकरण करणे, नदीकाठावर आवश्यक संरक्षक व्यवस्था उभारणे आणि रखडलेले भूसंपादन पूर्ण करणे, या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. महापालिका प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष देऊन पर्यायी रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीसाठी उपयुक्त करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





