Pune | आधीच थंडीची लाट, त्यात पावसाचे सावट

पुणे, – राज्यातील हवामान बदलामुळे पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असेल. मात्र, दि. १ आणि २ डिसेंबरनंतर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पारा एक अंशाने घटला आणि यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये थंडीची लाट आली असून, पुणे शहरातही काही भागात थंडीची लाट होती. दरम्यान, पुढील दोन दिवस अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी थंडीची लाट असेल, असा अंदाज आहे.
नैऋत्य बंगाल उपसागरामध्ये अती तीव्र दाबाचे क्षेत्र स्थिर असून, पुढील २४ तासांत तमिळनाडूतील कराईकल ते महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता वाढून चक्रीय वादाळात रुपांतर होईल. मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, महाबळेश्वर, विदर्भातील गोंदिया आणि नागपूर तर मराठवाड्यातील परभणी आणि संभाजीनगर परिसरातील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.





