Allu Arjun : जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा तुम्ही..? अल्लू अर्जुनची पोलिसांकडून कसून चौकशी; 2 तासात विचारले ‘हे’ महत्वाचे प्रश्न

Pushpa 2 । Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरत आहे. एकीकडे असे चित्र असताना मागील काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या संकटात वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तरीही त्याला एक रात्र तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. आता अल्लूला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावले आहे. आज सकाळी 11 वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
यासाठी त्याला चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आज पोलिसांकडून अल्लू अर्जुनची कसून चौकशी करण्यात आली आहे. एसीपी रमेश आणि सीआय राजू यांच्या देखरेखीखाली अभिनेत्याची चौकशी केली गेली. यावेळी अल्लू अर्जुनसोबत त्याचे वकील अशोक रेड्डीही होते. या चौकशीत त्याला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले.
अभिनेत्याला पोलिसांनी कोणते प्रश्न विचारले….
– संध्या थिएटरमधील प्रीमियर शोला उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली होती का?
– तुम्हाला संध्याकाळी थिएटरमध्ये जाण्याची परवानगी मिळाली होती का?
– तुम्ही तिथं येत आहात हे तुम्ही थिएटर मॅनेजमेंटला आधीच सांगितलं होतं का?
– थिएटर व्यवस्थापनानं तुम्हाला तिथं येण्यास नकार दिला होता का?
– तुम्हाला माहिती होती का की पोलिसांनी तुम्हाला थिएटरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती?
– तुम्ही आणि तुमच्या PR टीमने थेट पोलिसांशी संपर्क साधून मंजुरी मिळवली का?
– संध्या थिएटरच्या आजूबाजूची परिस्थिती काय होती हे तुमच्या टीमने तुम्हाला सांगितलं होतं का?
– जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा तिथं सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात होते का?
– जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये पोहोचलात तेव्हा तिथं परिस्थिती काय होती?
– जेव्हा चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा जीव गेला तेव्हा तुम्ही तिथं उपस्थित होता का?
– तुम्ही संध्या थिएटरमध्ये किती काळ थांबलात?
– जेव्हा तुम्हाला चेंगराचेंगरीची बातमी मिळाली तेव्हा तुम्ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय केलं?






