Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा! संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

Allu Arjun | Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली असून, अनेक बड्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ‘पुष्पा 2’ चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकली आहे.
एकीकडे चित्रपट हिट होताना दिसत असताना मागील काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या संकटात वाढ होत असल्याचे दिसत आहे. ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. त्याला एक रात्र तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांकडून अल्लू अर्जुनची कसून चौकशी केली गेली.
दरम्यान, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात अभिनेत्यावर आरोप करण्यात आले होते. आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.
या प्रकरणी आज नामपल्ली कोर्टात सुनावणी झाली. ज्यामध्ये न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यासोबतच अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
संध्या थिएटरमध्ये नेमकं काय घडलं?
4 डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’चा प्रीमियर शो साठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आणि आवश्यक व्यवस्थेच्या अभावामुळे महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा यामध्ये जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तेव्हा पासून अभिनेता चांगलाच अडचणीत सापडला आहे.





