Rahul Gandhi : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली असून, कथित दुहेरी नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. (Rahul Gandhi) कोर्टाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील दबाव वाढला आहे. राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्व असल्याचे आरोप करण्यात आले होते. या संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, या आरोपांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, केंद्रीय यंत्रणेद्वारे तपास करण्याचे निर्देशही दिले आहेत. (Rahul Gandhi) ही याचिका भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी दाखल केली होती. त्यांनी २८ जानेवारी रोजी लखनौतील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्या न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास नकार देत नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर याचिकाकर्त्याने हायकोर्टात धाव घेतली. कर्नाटकातील रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याने भारतीय दंड संहिता, शासकीय गुपित कायदा, विदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यांअंतर्गत आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली होती. (Rahul Gandhi) विग्नेश शिशिर यांनी अशीही मागणी केली होती की, राहुल गांधी यांच्याकडे दोन देशांचं नागरिकत्व आहे. भारताबरोबरच ब्रिटनचंही नागरिकत्व असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. जर असे असेल तर त्याला भारतात निवडणूक लढवता येत नाही, तसेच अशी व्यक्ती खासदार होऊ शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या याचिकेतून शिशिर यांनी केली होती. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडून आले. यानंतर विग्नेश शिशिर यांनी कोर्टात याचिका दाखल केली की, राहुल गांधी यांच्याकडं ब्रिटिश नागरीकत्व आहे, त्यामुळे त्यांचे खासदार होणे हे बेकायदा आहे. या पार्श्वभूमीवर आता हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.