रांजणगाव गणपती येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) : रांजणगाव गणपती येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संबधित रुग्ण राहत असलेला व काम करत असलेला ५ किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार रांजणगाव येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील अशी माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
बँका, खताची दुकाने, पाणी वितरण, दुध वितरण, गँस वितरण, मेडीकल, दवाखाने, किराणा दुकाने ही १४ दिवस सकाळी ९ ते १२ या कालावधीत चालू राहतील. तर भाजीपाला विक्री रविवारी व बुधवारी सकाळी ९ ते १२ या कालावधीत सुरु राहिल. त्याच प्रमाणे गावातील सर्व आस्थापना ९ जुलै २०२० पर्यत १००% बंद राहतील. या दरम्यान औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांना मुभा असेल असे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, कामगार तलाठी सतिश पलांडे, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे, वैद्यकिय अधिकारी डाँ. महेश सातव आदी उपस्थित होते.
दरम्यान, रांजणगावात विनाकारण फिरणाऱ्यावर, रस्त्यावर थुंकणांऱ्यावर व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. संबधित रुग्णाच्या संर्पकातील १७ जणांचे स्वँब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून २० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाँ. महेश सातव यांनी सांगितले.





