Mukesh Khanna : “ते सर्व कलाकार…; अभिनेते मुकेश खन्ना यांनी महाभारतातील कलाकारांची उडवली खिल्ली, नेमकं काय काय म्हणाले?

Mukesh Khanna : आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना यांनी भीष्म पितामहची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याने महाभारत मालिकेत अभिनय केलेल्या कलाकरांबाबत एका विधानामुळे वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत.
व्हीटीव्ही गुजरातच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ‘महाभारत’मधील त्यांच्या सहकलाकारांच्या वर्तनावर टीका केली. तसेच बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांच्या एका विधानाची आठवण करून देताना ते म्हणाले की, खरा पुरूष तोच असतो ज्याचे जास्त अफेअर असतात. त्यांनी ‘महाभारत’मध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांना ‘छिछोरा’ असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले?
“भारतीय संस्कृती संपत चालली आहे, मला हसू येतंय. मला माफ करा, ‘महाभारत’चे संपूर्ण कलाकार बदमाशांनी भरलेले होते. दुर्योधन, अर्जुन… सगळेच. फक्त मीच वेगळा होतो.” “रवी चोप्रा एकदा महाभारताच्या सेटवर मला काहीतरी म्हणाले होते. ते म्हणाले होते की खरा पुरूष तोच असतो ज्याचे जास्त अफेअर असतात. मग मी त्यांना सांगितले की अफेअर्सची संख्या तुमचे पुरुषत्व सिद्ध करत नाही. खरा पुरूष तोच असतो जो त्याच्या कुटुंबाची काळजी घेतो.”
मुकेश खन्ना यांनी हे विधान करण्यामागे नेमकं काय घडलं होतं, ते पाहूयात. महाभारत’च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ खूप लोकप्रिय झाला होता. त्यात सर्व कलाकार एकमेकांना मिठी मारून रडत होते. तर “एकदा आमच्या गुजराती सह-अभिनेत्याला ‘महाभारत’मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला होता की मुकेश खन्ना बेडकांमधील एक राजकुमार आहे.”
यामुळे अभिनेते मुकेश खन्ना यांनी कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज आणि अर्जुनची भूमिका साकारणारे फिरोज खान यांच्यावरही निशाणा साधला आहे. कलाकारांच्या मिठी मारून रडतानाच्या व्हिडीओमध्ये अंतर राखून होतो, असं त्यांनी सांगितले. मात्र, हे खरं आहे की सेटवरील लोकांमध्ये एक घट्ट नात तयार झालं होतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महाभारत मालिका
‘महाभारत’ ही मालिका दूरदर्शनवर २ ऑक्टोबर १९८८ पासून सुरू झाली आणि २४ जून १९९० पर्यंत सुरू होती. पुनीत इस्सर, गूफी पेंटल, पंकज धीर, प्रवीण कुमार, गिरिजा शंकर, रूपा गांगुली आणि नाजनीन या कलाकारांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. यानंतर महाभारतावर आधारित आणखी मालिका बनवल्या गेल्या. पण बीआर चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या महाभारताच्या पातळीला कोणीही स्पर्श करू शकले नाही.





