पुण्यातील चारही धरणे फुल्ल; चिंता गुल्ल !

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे 100 टक्के भरली आहेत. टेमघरही भरण्याच्या मार्गावर आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण 28.22 टीएमसी म्हणजे 97 टक्के पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पातील या चार धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाल्याने वर्षभरासाठी शहराचा पिण्याच्या व ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. पानशेत धरणातून दुपारी 8 हजार 320 क्युसेकने विसर्ग सुरु होता तो आता 5 हजार 408 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते.
खडकवासला धरणात पानशेत धरणातून येणारे पाणी तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी यामुळे खड्कवासला धरणातून 27 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र पानशेतमधून विसर्ग कमी केल्याने खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे.खडकवासला धरणात दिवसभरात 1 मिमी, पानशेत 15 मिमी., वरसगाव 18 मिमी. आणि टेमघर 45 मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खडकवासला1.97100
पानशेत10.5799.27
वरसगाव12.5998.19
टेमघर3.0998.19
(पाणीसाठी टीएमसीमध्ये)





