SSC Exam : अॅाल द बेस्ट! उद्यापासून दहावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात; विद्यार्थ्यांनो टेन्शन न घेता पेपर सोडवा!

पुणेः शुक्रवार दि. २१ फेब्रुवारीपासून राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परिक्षेला सुरूवात होत आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याअगोदर बारावीचीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. राज्यातील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देणार आहेत.
या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ याबाबत पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सविस्तर माहिती देणार आहे.
उद्यापासून होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी सुरू आहे. आसनव्यवस्था, कॉपीमुक्त परीक्षा, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था करण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागातून २७ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
सीसीटीव्हीची नजर
कॅापीचे प्रकार टाळण्यासाठी अनेक जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर कॅमेऱ्यांची नजर विद्यार्थ्यांवर असणार आहे. तसेच भरारी पथक आणि बैठ्या पथकांना पण बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर सर्वास कॅापी करण्याचे प्रकार घडले होते. यामुळे अशा केंद्रावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.





