Jayant Chaudhary : अमित शहांवर टीका करणाऱ्या सर्व प्रवक्त्यांना हटवले; जयंत चौधरी यांची मोठी कारवाई !

Amit Shah | Jayant Chaudhary – राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मोठी कारवाई करत आपल्या पक्षाच्या सर्व प्रकत्यांना पदावरून हटवले आहे. सर्व प्रवक्त्यांचे काम तत्काळ थांबवण्यात आले असल्याचे निवेदन लोकदलाकडून जारी करण्यात आले आहे. पक्षाच्या एका प्रवक्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणारे विधान केले होते.
त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जाते आहे. शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक विधान केल्यामुळे ते अडचणीत आले असून विरोधी पक्षांकडून त्यांना लक्ष्य केले जाते आहे.
राज्यसभेत विरोधी पक्षांवर टीका करताना अमित शहा म्हणाले होते की आता एक फॅशन झाली आहे आंबेडकर आंबेडकर आंबेडकर…एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मे स्वर्ग प्राप्त झाले असते. शहांचे हे विधान म्हणजे डॉ. आंबेडकर यांचा अवमान असल्याचे म्हणत कॉंग्रेस आणि अन्य विरोधकांनी शहांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोकदलाचे प्रवक्ते कमल गौतम यांनीही शहांवर टीका करणारे विधान केल्यामुळे पक्षाकडून कारवाईचे पाउल उचलण्यात आले आहे. प्रवक्ता म्हणाला होता की गृहमंत्र्यांचे विधान अयोग्य आहे. त्यांनी माफी मागावी. जे लोक बाबासाहेब आंबेडकर यांना भगवान मानतात ते मानतच राहतील. असे विधान करणे योग्य नाही.





