सर्वच डाळी आणखी महागल्या! दोन महिन्यांत किलोमागे १० ते २५ रुपयांनी भाववाढ

पुणे – गेल्या वर्षी कमी पाऊस आणि घटलेले उत्पादन यामुळे डाळींचे भाव आणखी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. डाळींचे भाव कमी कधी होणार का? यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलणार का, असा प्रश्न सामान्य ग्राहक करीत आहेत.
डाळ उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नाही. लागणाऱ्या डाळींपैकी ६० टक्के डाळ भारतात उत्पादित होते. तर, उर्वरित ४० टक्के माल परदेशातून आयात होतो. पाऊस कमी असल्याचा फटका देशातील कडधान्य उत्पादनावर झाला आहे. मागील दोन वर्षे उत्पन्न कमी होत आहे. त्यातच परदेशातील कडधान्ये उत्पादित देशातही पाऊस कमी झाला आहे.
तेथेही उत्पादन कमी झाले आहे. त्यातच देशात आयात शुल्क जास्त आहे. त्यामुळे आवक कमी होत आहे. या सर्व कारणांमुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींचे भाव तेजीत आहेत.
तूरडाळ आवाक्याबाहेर
मागील वर्षापासून तूरडाळीच्या भावात वारंवार वाढ होत आहे. मागील वर्षी १५५ रुपये किलो भाव होता. तर त्यात आणखी १० ते १५ रुपये वाढून होऊन १७० ते १७७ रुपये किलो भाव झाला आहे. परिणामी, तूरडाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
“मार्केट या्र्डातील भुसार बाजारात डाळी आणि कडधान्याची दररोज सुमारे १५० ते १७५ टन आवक होते. घरगुती ग्राहाकांसह हॉटेलात खाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. डाळींच्या तेजीचा परिणाम म्हणून बेसन आणि भाजके डाळे भावात आणखी वाढत आहे. बाजारात गेल्या काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहेत.” – नितीन नहार, डाळीचे व्यापारी
डाळीचे प्रतिकिलाे वाढलेले भाव (जून २०२४)
तूर- १७० ते १९० रु.
उडीद – १४० ते १५० रु.
मूग – १२० ते १३० रु.
हरभरा – ९० ते ९२ रु.
मसूर – ७५ ते ८५ रु.





