बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा; शरद पवार राहणार उपस्थित

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला 16 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. याप्रकरणी राज्यभरात संतापही लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड पोलीसांवर अगोदरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. तसेच सीआयडी सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहे.
शनिवारी याविरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत. त्यात शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहे. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी याविषयीची माहिती दिली.
खासदार सोनवणे यांनी व्यक्त केला संताप
बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशतीचे आणि गुंडागर्दी वाढली आहे. खंडणी वसूल करण्यात येत आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडीवर खासदार सोनवणे यांनी संताप व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपींना फाशी द्या. मास्टर माईंडलाही शिक्षा झाली पाहिजे. अजून तीन आरोपी फरार आहे. त्यांना कधी अटक करणार आहात? असा सवाल त्यांनी केला. यावेळी सोनवणे यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला. अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, पालकमंत्री कुणीही व्हावं. कुणालाही करावं. पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
कैलास फडवर गुन्हा दाखल
दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता बीडमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आली असून हवेत गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या घटनेनंतर बीडमधी सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा:





