मुंडेंचा घरगडी ते बीडचा मास्टर माईंड! जाणून घ्या वाल्मिक कराड कसा घडला…

मस्साजोग येथे झालेल्या सरपंच हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. या निर्घृण हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. अशातच आज या प्रकरणात एक महत्वाची घडामोड घडली असून या गुन्ह्याचा कथित मास्टर माईंड वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे.
या गुन्ह्यामध्ये नाव आल्यानंतर कराड फरार झाला होता, अखेर आज त्याला उपरती आली असून तो स्वतःच सीआयडीला शरण आला आहे. संपूर्ण राज्यात चर्चा होत असलेल्या या वाल्मिक कराडचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया….
शिक्षणासाठी वाल्मिक कराड बीड येथे आला. त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी छोटीशी नौकरी मिळाली. यातूनच त्याचे मुंडे कुटुंबासोबत पहिल्यांदा संबंध आले.
1980
वाल्मिक कराड याने परळीत गणेश मंडळ स्थापन केले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले.
1990 (पूर्वार्ध)
बीडमधील एका महाविद्यालयाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कराड याच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर त्यांचे मुंडे कुटुंबाशी संबंध दृढ झाले.
1990 (उत्तरार्ध)
वाल्मिक कराडने परळीत भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा स्थापन केली आणि अटल संदेश यात्रेचे आयोजन केले.
2001
पंडित अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कराडने परळी नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून विजय मिळवला. त्यानंतर तो उपमहापौर आणि काही काळासाठी कार्यकारी महापौर देखील झाला.
2017
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कराड पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला.
2023
परळीत आयोजित “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून कराड याने आपल्या संघटन कौशल्याचा दाखला दिला. या कार्यक्रमाचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
डिसेंबर 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराडचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले.





