सनी देओलच्या ‘गदर 2′ निमित्त चारही भावंड एकत्र; धर्मेंद्र यांनी शेअर केली खास पोस्ट

मुंबई – अभिनेता सनी देओलचा बहूचर्चित ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 23 वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. या चित्रपटानिमित्त सनी देओलचे सर्व भावंड एकत्र आले होते. सनी देओलची सावत्र बहीण ईशाने गदर 2 चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. या स्क्रीनिंगला बॉबी व सनी देओलने हजेरी लावली होती. त्यांचे एकत्र व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल यांना एकत्र पाहिल्यानंतर धर्मेंद्र देखील भावुक झाल्याचे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. पण या व्हिडीओवर अद्याप अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी सनीचा मुलगा करण देओलचे लग्न झाले. मात्र या लग्नाला ईशा देओल आणि अहाना देओल उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ईशाने तिच्या एक पोस्ट शेअर करत अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ईशाने सनीच्या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवल्याने ही चारही भावंड एकत्र दिसली. त्यांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, ‘गदर 2′या चित्रपटाने तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पाहिल्या दिवशी सिनेमाने 40 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 43 कोटी रुपयांची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 50 कोटींचा गल्ला जमवला होता.






