All Eyes on Rafah : गेल्या जवळपास आठ-नऊ महिन्यांपासून इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे सध्या तरी चिन्ह दिसत नाही. इस्राइलला प्रत्युत्तर म्हणून हमासच्या अतिरेक्यांनी चार महिन्यांनी तेल अविववर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने राफावर हल्ला केला. गेल्या काही दिवसांत इस्राइलने राफावरील हल्ले वाढवल्याचं दिसत आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामध्ये कमीत कमी 45 पॅलिस्टिनी लोक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू झाल्यापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक पॅलेस्टिनी लोक रफामध्ये एके ठिकाणी विस्थापित झाले आहेत. या विस्थापितांच्या तंबूंवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रफाह शहरावर केलेल्या हवाई हल्ल्याची चूक इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी मान्य केली आहे. या हल्ल्यामुळे विस्थापितांच्या तंबूंना आग लागली होती. त्यामध्ये 45 पॅलेस्टिनी विस्थापितांचा मृत्यू झाला झाला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मोठी टीका झाली होती. हमासविरोधात इस्रायलने सुरू केलेल्या युद्धापासून होत असलेल्या टीकेमध्ये या हल्ल्यामुळे भरच पडली आहे. हल्ल्यामध्ये सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे आता इस्रायलच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. सोशल मीडियावर एक मोहीम देखील राबवली गेल्याचं दिसून येत आहे. ‘All Eyes on Rafah’ म्हणजेच राफावर सर्वांच्या नजरा… हे कॅप्शन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी दिसत आहे. सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रेटिंपर्यंत अनेकांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर केलंय. वाळवंटी भागात एका रचनेत बांधलेले खूप सारे तंबू आणि त्यावर लिहिलेलं ‘All Eyes On Rafah’ असा हा फोटो आहे. त्यानंतर #AllEyesOnRafah हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. रफा हा परिसर हमास संघटनेचा शेवटचा बालेकिल्ला असून, तो देखील निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला होता. माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन, समंथा राऊत प्रभू, तृप्ती डिमरीसह अनेक सेलिब्रेटिंनी हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केलंय. गेल्या 24 तासांमध्ये 29 दशलक्षवेळा ‘All Eyes On Rafah’ कॅप्शन असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. हे छायाचित्र खरे आहे का? हे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा (AI) वापर करून तयार करण्यात आले असण्याची शक्यता अधिक आहे. फेक न्यूजबाबत अभ्यास करणारे मार्क ओवेन जोन्स याबाबत म्हणाले की, प्रथमदर्शनी हे छायाचित्र AI द्वारे तयार करण्यात आल्यासारखे भासते. कारण- हे खरे वाटत नाही. या छायाचित्रातील सावलीची रचनाही नैसर्गिक वाटत नाही आणि त्यातील तंबूही वास्तवदर्शी वाटत नाहीत. त्यामुळे या लक्षणांवरून तरी हे छायाचित्र AI चा वापर करून तयार केलेले वाटते. ‘All Eyes on Rafah’ ही घोषणा कुठून प्रचलित झाली? इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाचे संचालक रिक पीपरकॉर्न यांच्या विधानांमधून ही घोषणा प्रचलित झाली आहे. रफा हा परिसर हमास संघटनेचा शेवटचा बालेकिल्ला असून, तोदेखील निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला होता. त्या आदेशानंतर WHO चे संचालक रिक पीपरकॉर्न यांनी फेब्रुवारीमध्ये हे वक्तव्य केले होते. त्यातूनच ‘All Eyes on Rafah’ हा वाक्यांश प्रचलित झाला आहे. नेतान्याहू यांनी मान्य केली हवाई हल्ल्याची चूक नेतान्याहू यांनी आपल्या चूकीबद्दल फारसा तपशील दिला नाही. कारवाईमुळे सामान्य नागरिकांना काही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेतल्यानंतरही एक चूक झाली आहे, असे नेतान्याहू यांनी इस्रायली संसदेत बोलताना सांगितले. रविवारी रात्री करण्यात आलेला हा हवाई हल्ला हमासच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता आणि या हल्ल्यात हमासचे दोन वरिष्ठ दहशतवादी मारले गेले होते, असे इस्रायली सैन्याने सुरुवातीला म्हटले होते. मात्र पॅलेस्टिनींच्या तंबूंवर हल्ला झाला आणि त्यातून आग लागल्याचे उघड झाल्यावर इस्रायलने या प्रकाराची चौकशी सुरू केल्याचे सांगितले.