नवी दिल्ली – टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले, तिथे त्यांचा संपर्क तुटला. 18 जून रोजी ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासातच संपर्क तुटला होता.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या पाणबुडीमध्ये 96 तास पुरेल एवढा ऑक्सिजन होता. विमाने, जहाजे, रिमोटने नियंत्रित केली जाणारी पाण्याखालील बोटी आणि अमेरिकेच्या नौदलाच्या विशेष बचाव वाहनांच्या मदतीने हा शोध घेतला जात होता.