आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Alia Bhatt New Film| अभिनेत्री आलिया भट्टने अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक छाप निर्माण केली आहे. चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. यात आता तिच्या आगामी ‘ जिगरा’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मागील वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची वाट पाहत होते, जे निर्मात्यांनी उघड केले आहे.
आलियाचा जिगरा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जिगरा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं जिगरा या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं, “11.10.2024. आलियाचा ‘जिगरा’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘जिगरा’ निर्माता करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. करणसोबत आलियाचा हा आणखी एक चित्रपट असेल. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना दिसणार आहे. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर जिगरा या चित्रपटाची टक्कर ‘देवरा’ या चित्रपटासोबत होणार आहे. देवरा हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.





