Ali Khamenei : खामेनींच्या अंत्यसंस्कारासाठी मार्गेरिटा, हसनैन उपस्थित राहणार; परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा
परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन हे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या दफनविधीच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुक्रवारी इराणला जाणार आहेत, अशी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी घोषणा केली.

Ali Khamenei : परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन हे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या दफनविधीच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुक्रवारी इराणला जाणार आहेत, अशी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी घोषणा केली.
मंत्रालयाने म्हटले की, इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते खामेनी यांच्या (Ali Khamenei) अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी हसनैन आणि मार्गेरिटा ३ जुलै रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला भेट देतील. या समारंभातील उच्च-स्तरीय प्रतिनिधित्व दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध आणि लोका-लोकांमधील संपर्काचे महत्त्व अधोरेखित करते, ज्यामुळे राजकीय आणि आर्थिक संबंधांना भक्कम आधार मिळतो.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अंत्यसंस्कारासाठी निमंत्रित केले होते. गेल्या तीन दशकांपासून इराणचे नेतृत्व करणारे खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाची सुरुवात ४-५ जुलै दरम्यान तेहरानमधील निरोप समारंभाने होईल आणि इराणची राजधानी असलेल्या या शहरात मुख्य अंत्ययात्रा ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ७ जुलै रोजी पवित्र शहर कोम येथे धार्मिक विधी पार पडतील आणि खामेनी यांचे जन्मगाव असलेल्या मशहद येथे ९ जुलै रोजी दफनविधी होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना निमंत्रण
इराणने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच पक्षाचे नेते सलमान खुर्शीद आणि पवन खेडा यांना खामेनी (Ali Khamenei) यांच्या दफनविधीसाठी निमंत्रित केले आहे. हा दफनविधीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष इराणला जाणाऱ्या पक्षाच्या शिष्टमंडळाला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहेत, असे काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख खुर्शीद यांनी सांगितले.






