Maharashtra Rain | राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. धाराशिव, बीडसह मराठवाड्यातील काही भागात सध्या पूरस्थिती परिस्थिती कायम आहे. याशिवाय मुंबई, पुण्यात देखील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. याचदरम्यान आता हवामान विभागाकडून काही जिल्हयांना अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाने जोर धरला आहे. पुढील ४८ तास राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर , नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्हयांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवाहन – धोकादायक भागात जाणे टाळावे, पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळा, पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्या, पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे, पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार? काँग्रेसच्या शिलेदारांनी सांगितला ‘हा’ फॉर्म्युला; पुण्यातल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?